तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी
जागा होतो तेंव्हाही तुझ्याच गंधाने दरवळतो मी.
कधी वाटते तुझी कुंडले
सापडतील मज अभऱ्याखाली.
कधी वाटते खांद्यावरती
केस तुझे निखळले राहतील.
तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी
माझेच मला मिठीत घ्यावे इतका हर्षून जातो मी.
कधी वाटते खरो खरीच
तुझ्यासवे जगतो मी
तेव्हा तेव्हां अलगद कळते
गोकुळातच असतो मी.
तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी
अंतरंग अंतरिक्षाचे व्हावे असा स्वप्नमय होतो मी.
कधी वाटते प्राणांतिक गात्रे
तुझ्या स्पर्शाने पवित्र होतील
कधी वाटते चंदन सारे
अंगावरती बहरून येईल.
कधी वाटते कळेल सारे
राना मधल्या मोरांनाही
कधी वाटते प्रभाकरही
रश्मीला धाडेल दुपारी
तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी
रज्जुमधल्या कणाकणाला वाहवलेला कळतो मी.
इतक्या इतक्या लांब रात्रींना
रात्र तरी म्हणू कसा मी
उजळतात चक्षुतून सूर्ये
जेव्हा तुझी स्वप्ने बघतो मी.
Comments
Post a Comment