नकोशी झालेली माणसे जवळच बाळगून
तो घर सजविण्याच्या कल्पनेत रमतो,
कुणासाठीतरी महागडा बुके विकत घेतो
गाडीच्या मागच्या सीटवर मुद्दाम विसरतो.
चादरीला चारही कोपऱ्यात घट्ट बसवतो
वळ्या दुर करतो, स्वतः सोफ्यावर आडवा होतो.
पहिल्या प्रियेसीच वाढलेल्या पोटावर केलेलं
कमेंट
वाचतो आणि डोळे मुद्दाम मिटतो.
शेव्हिग क्रीमच्या जाहिरातीत काय भारी ट्यून आहे
ती गुणगुणत आरश्यासमोर उभा राहतो,
एक्सेल शीटच्या रिकाम्या रखान्यात
कानावरचे केस अलगद कात्रीने कापतो.
हरवलेल्या पावसाळी दिवसांची आठवण
मोरपिसांसारखी हळुवारच असावी अशी सक्ती नाहीना?
बंद पडलेलं घड्याळ दिवसातून दोनदा वेळ बरोबर दाखवते
एव्हडे तरी नीट आज आपण वागतोय ना?
बरेचदा प्रश्नही तेच ते पडतात
इतका रटाळवाणा दिवस जातो,
ती वारंवार पदर नीट करते
आणि तो
फक्त चष्म्याच्या काचा स्वच्छ करतो.
आजकाल कुणाच्याही भेटीला जातो
काय बोलावे आधी विचार करतो
मरीन ड्राईव्ह पेक्षा कुर्ला स्टेशन
वर
तो एकटाच बसतो गाणी ऐकतो.
रात्री घरीही येतो टीव्हीच्या काळजीने
अलगद इस्त्रीचे कपडे कपाटात ठेवतो
आसमंत दरवाळलेला असतो पत्ताकोबीनें
तो सॉक्स काढतो हवेत दुःख्ख मिसळवतो.
Comments
Post a Comment