काही पांढऱ्या छटा तुझ्या कपाळावर दिसु लागल्या आणि नजरेत ओढून घेणारे संमोहन उतरू आले. थोडी विचलित, थोडी विलगता, थोडे गांभार्य, थोडे प्रेम, छटा होत्या शिशिराच्या, सारेच डोळ्यांत घडू लागले . चाळीशीच्या धीराने, केवड्याचे अत्तर दरवळू लागले तुझे रूप दाट गुलकंदाचे, मन प्रसादाचे तांबूल झाले. कुंड्यांमधले, वृन्दावनचे देठन देठ हिरवे झाले, पाटीवर नाव माझे सुचक, घर तुझे कृतार्थ झाले. चंदनाचे होते कि होते खैराचे वा बाभळीचे करपलेले तुझे हात घट्ट मळलेले पीठ होते. मी दुःख रेखाटून कागदाचे फुल झालो जे भोगले तु, ते वाळवणाचे गीत झाले. तुझ्या त्वचे खाली इंद्रायणी गुप्त झाली, मी उकरून काढतो रक्तबीजाच्या ओळी मनधरीनी करिता ही, उजळतो तुझा रुसवा ते रुसणेही असते उबदार गुळाची पोळी मी परिघावर बिंबित अर्थ शोधतो जगण्याचा फिरतो बाजार शब्दांचा, पटके बांधून डोक्याशी तू नसतेस नेटकी साडी, खोचते पदर पोटाशी हा सुगंध दरवळणारा, असतोच तुझ्या नाभीशी.