आलिंगन
तुझे ओठ पलाशच्या टंच पाकळ्या होतात,
तेव्हा मी पारंब्यांच्या जाळीतून धनेश उडतांना बघतो.
ध्यान एकाग्र करतो भुवयांमध्ये, चंदनाचा गंध दरवळतो,
तुझे केस जाळं पसरल्यागत विखरू लागतात, मी गार भस्म होतो.
तुझ्या काजळाच्या रेषा अजूनच तीक्ष्ण होतात,
मला तिमिराच्या कोसेतून मुक्त होणारा नाग दिसतो.
स्वप्नांत कळतं का कधी स्वप्नाचं वेळभान? केवडा विषावर घेरतो,
तुझी बोटे छातीवर फिरतात, शिवारावर शिंगरू थबकतो, मी गप्प होतो.
तुझ्या गोऱ्या वक्षाशेजारी निळी हिरवी वेल तप्त होते,
उंच फांदीवर बसलेलं जनावरं ढिबक्यांचं टापदिशी खाली येतं.
मी ओंजळ रिकामी करतो, एकटं रेषांचं झाड बगळ्यांनी भरू लागतं
उबदार तुझ्या श्वासांनी माझे कान हलके होतात, हवेत मारवा स्तिर होतो .
Comments
Post a Comment