Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

बायको

कोणीतरी कोणावर आभाळाएव्हड प्रेम करतो पण आभाळाच्या कुशीत शिरता येत नाही तीस वर्ष्याच्या घोड्म्याला आईही मांडीवर बसवत नाही. मग क्षणाची पत्नी आनंतकाळाची माया देणारी होते. वात्स्यल्याला नसतो दुसरा पर्याय ती आत्म्याची छाया होते. स्तनां बदलची जिज्ञासा, माया, कौतुक, आश्चर्य,प्रेम, भावविश्वाची सहनशील पोलादी ढाल कमाल होते "तिथेच पुरुषांचे भावते " अस ती म्हणते. भिजू घातलेली कडधान्ये रात्रभर भिजतात भांड्य बाहेर येतील इतकी ती फुगतात अंकुर फुटलं तरी स्वतःला दुभागून उगवायच तिसरच काही हाड नसलेल्या जिभेचे दोष एका शब्दाचे होते काही वाही अबोल्याच्याच सकाळी नेमकी उसवते बाही किंवा महत्वाच्या  कागदावर हवी असते सही. पहाटे अलगद येतो एक हात छातीवर अबोल्याच्या पाच रात्रींनंतर केव्हडे वजन हा… . .! श्वास अड्तोही, भराभर घेतोही रेटीना च्या पापुद्र्यावर घडी वर घडी साखळी टाक्याला चुकलेली तू उसवते एक एक कडी. मग तुझा हात घसरत जातो छातीवरून ढगांच्या मऊ कासव पावलांचा, चढलेला आसतो मोराच्या धुंद कंठा मध्ये ब्रम्ह लहरी नाद. पुढे घड्याळीचे कुटील कारस्थान किंवा दुधवाल्या माकडाचे भूभ

ओशाळ घुम्या रात्री.

एक लाडिक गुलाबी चम्बु शब्दांना आलेले आकार आवाजांचे पुंजके, चिऊ काऊ ते हाऊ वर  कधी कौसल्येचा राम कधी नाणी तेरी मोरणीको हे सगळ पांघरूनाच्या तंबूतून घडतंय. एका महाकाव्याच्या तिसऱ्या पर्वात पाठीवर दणका आणि "झोप ग आता" चंद्र पर्येंत पोचतंय. तो तरी काय करणार बिच्चारा? दिवसाच्या चाळणीतून, बोललेलं, घडलेलं, धावलेल, पाडलेल सगळच्या सगळं ओवल जातंय पटकथेच्या अभ्रकी तुकड्यातून अतिभयानक स्वप्नाच्या गळ्यात. सगळी रात्र लाथा लाथ झोपेत खुदकन हसली मग थोड्यावेळाने पुटपुटली एव्हडं काय ग ओरडण्यासारख त्यात? रात्र जेव्हा अधिकच काळी होते गडद कावळ्याच्या पंखासारखी जळलेल्या भाकरीची किंवा राखेची चव आठवते ओठांना पावसाळी बुटात दडलेल्या बेडकाचा स्पर्श आठवतो बोटांना. ओठांवर असत ते मृत्यूच गीत की दीर्घ चुंबनाचा तुरटपणा शिशिर झोप कि अवास्तव पाण्यात त्वचेवरचा गुळगुळीतपणा.  कबंधापुरते बरे असते झोपेत आलिंगन.  कबंधापुरता बारा असतो श्वासांचा वेग.  कबंधापुरता बारा असतो झिरपणारा घाम.  कबंधापुरता बारा असतो  पेललेला भार. त्यापलीकडे मुठी एव्हड्या उंदराला सापांच्या जातींची जाणीव असते अपर

नाईलाजेचा चंद्र

हिरमुसलेल, गळून पडलेलं गुलमोहोराच लाल तांबड अंगण उन्हाळ्याच्या संध्याकाळी लांब सावल्यांनी बडबडतय. तहानलेला उशिराने परत येतो मडक्यातले गार पाणी पितो तेव्हा हे सगळं ऐकून घेतो. दुखणाऱ्या उजव्या खांद्यावर पाखरू बसु पाहत वेदनेच्या वाफेवर तुटलेलं इंजिन धाऊ पाहत. चाबी देऊन सुध्धा हे चालत नाही हाताने ढकलले तरी पुढे जात नाही.  ह्या किवा त्या कारणाने चंद्राला उगवावच लागत तेव्हा तलम मऊ चादरीला नेमके दोन गंध येतात अवास्तव दुनियेत  भान हरवलेल्या सु सु चा आणि पाच रुपये एव्हड्या महाग वेणीच्या मोगऱ्याचा. पाठीवरच्या  वळांना आणि खांद्याच्या दुखऱ्या बाजुंनाही तेव्हा नेमक्या दोन आठवणी येतात एक आई  जवळ असण्याच्या, दुसर मोरपिसाच्या फिरण्याच्या. स्वार्थ पांघरून तिच्या पाठीच्या कण्यावर क्याकट्स रुपेरी फुलच उमलते म्हणा ना ! माझ्या पाठीवर बळजबरीचे कुबड, कानांमध्ये यंत्रासारखा घनांना. उन्हाळ्यात एसीची कृत्रिम थंडी मग पुन्हा दुलईची उर्मी गर्मी पांघरुणा बाहेरच चांदण सोसता येत नाही पांघरुणाच्या आतुन काळोख पीत येत नाही बिच्चारा मी, सरलेल्या अंगाई नंतरही झोप का ग येत नाही?  अनावधान

कल्चर शॉप मध्ये कविता वाचन

मी कविता वाचू लागलो की त्यांचं पोट खळबळत संडास लागते इतकी माझ्या शब्दांची प्रतिभा?  मला जाणवते!  विंदा, सुर्वे, ढसाळ, चित्रे ऐकतायना ? एका कविता वाचनाच्या कार्यक्रमात विदेशी लोकांना आम्ही कविता भाषांतरित करूनहि ऐकवल्या पण इंडियन इंग्लिश कवीना त्यांच्या कवितेचा अर्थ हिंदीत सांगता आला नाही कार्यक्रमाचे तिकीट २०० रुपये कवी लोकांना चहाही विचारला नाही. ओपन माईक सुरु होताच कळलं ऐकणारेही कवीच होते कवी प्रेक्षकांच्या रांगेत बसले प्रेक्षक मंचावर गेले . त्यांनी मग जाहिरात केली फेसबुक वर सगळ्यांचे फोटो मी माझा फोटो व दुसरा टाळ्या वाजवणाऱ्यांचा लाईक केला. जे मित्र येऊ शकले नाही त्यांनी कंमेंट केल्या "तुझ्या सारखा दुसरा कवी होणे नाही" विंदा, सुर्वे, ढसाळ, चित्रे ऐकतायना ?

संध्याकाळ

आम्ही थकलो की घरी येतो ते थकले की बार मध्ये बसतात काही थकले तरीही ऊन उतरिणीला मरिनड्राईव्हच्या तापलेल्या कट्ट्यावर बसतात. काही नाटकाच्या तालमी बघायला किंवा रिकाम्या गाडीची वाट बघत बांद्र्याची हिरवळ चष्म्याच्या काचा पुसत लुटतात.  कधी कधी थकलेला असतानांही ते माडीवरही जातात व परत फिरताना मारोतीला. चहा बारा वाटतो दिवस उतरणीला तू मुद्दाम मसाला जरासाच वापरते बशीत एक चमचा साय. हे बघून हायस होतं अजून दुधावर साय येते? गोठ्यात गाय हंबरते. मुले गेली आहेत खेळायला किंवा क्लास ला मुली कराटे ला, मुले डान्सला. दार तिरप बंद आणि ऊन परततय तुझ्या मानेवरचा घामाचा थेंब चमकतोय. पुढच काय बोलु ब्यागेत तिच्या साठी गजरा आहे! डबा काढतांना ती माझ्या कडे डोळ्यांनी हसेल सोफा कम बेड पाय ताणेंल पुढे सरकेल. मग मी एक घोड चूक करतो टीव्हीचा रिमोट हातात घेतो लगेच बातम्या लागतात खोलीत अंधार होतो.

जूनच्या पहिल्या आठवड्यात

प्रजासत्ताक देशात उगवलेल्या जून महिन्यात व्यकुळतेला आलेलं उधाण उन्हाच्या चटक्यात घाम फुटणाऱ्या त्वचेचे शेतजमिनी सारखे नांगरले जाणारे नखांचे व्रण चष्म्याच्या काचेवर येणार चहाचे फुंकर कण एक एक पायरी चढून जाणारी ती गर्भवती आणि शेजारी सार्वजनिक संडासावर वाढलेली गर्दी बोळीच्या भिंत्तीवर "अल्ह्ड जवानी" चे चार पोस्टर वारंवार झळकणारे ते स्तनाळ चित्र, कोळश्यांनी लिहिले भडव्यांनी आपले फोन नंबर, चिंक्की चाहिये या मालियाली मिलेगा सब अंदर पानाच्या पिचकाऱ्या, सिगारेटीचे थूट, वास, दुर्घन्ध सकाळी ७:०२ ची लोकल ची गर्दी येते कधी नाहीशी होते कधी बूटपॉलिश वाल्यांच्या च्या टाप टाप आवाजात किती खेटर्र आली गेली प्रत्येक बुटात होतेच का पाय? चामडीच्या पोकळीला बुटांचे आकार चालवतात कि काय? तो न्यूजपेपर विकत घेतो मी रंगीत पान मागून घेतो हेडलाईन्स वाचून पारा चढतो म्हणून त्यालाही रंगीत पान हवं असतं. एका हाताने वारा घालत तो म्हणतो न्यूजपेपर संडास मध्येच वाचलेला बरा असतो. दुर्गंधात दुर्घन्ध जाणवत नाही. काही गमावलं ह्याच दुःख नाही. राष्ट्रवादी समाजवादी माओवादी मायनॉरिटी बहुजन ब्राह