Skip to main content

ओशाळ घुम्या रात्री.

एक लाडिक गुलाबी चम्बु
शब्दांना आलेले आकार आवाजांचे पुंजके,
चिऊ काऊ ते हाऊ
वर  कधी कौसल्येचा राम
कधी नाणी तेरी मोरणीको
हे सगळ पांघरूनाच्या तंबूतून घडतंय.

एका महाकाव्याच्या तिसऱ्या पर्वात पाठीवर दणका आणि
"झोप ग आता" चंद्र पर्येंत पोचतंय. तो तरी काय करणार बिच्चारा?

दिवसाच्या चाळणीतून,
बोललेलं, घडलेलं, धावलेल, पाडलेल
सगळच्या सगळं ओवल जातंय
पटकथेच्या अभ्रकी तुकड्यातून
अतिभयानक स्वप्नाच्या गळ्यात.

सगळी रात्र लाथा लाथ
झोपेत खुदकन हसली
मग थोड्यावेळाने पुटपुटली
एव्हडं काय ग ओरडण्यासारख त्यात?

रात्र जेव्हा अधिकच काळी होते गडद कावळ्याच्या पंखासारखी

जळलेल्या भाकरीची किंवा राखेची चव आठवते ओठांना
पावसाळी बुटात दडलेल्या बेडकाचा स्पर्श आठवतो बोटांना.
ओठांवर असत ते मृत्यूच गीत की दीर्घ चुंबनाचा तुरटपणा
शिशिर झोप कि अवास्तव पाण्यात त्वचेवरचा गुळगुळीतपणा. 

कबंधापुरते बरे असते झोपेत आलिंगन. 
कबंधापुरता बारा असतो श्वासांचा वेग. 
कबंधापुरता बारा असतो झिरपणारा घाम. 
कबंधापुरता बारा असतो  पेललेला भार.

त्यापलीकडे मुठी एव्हड्या उंदराला सापांच्या जातींची जाणीव असते अपरंपार
डोळ्यामध्ये खेळणाऱ्या आरश्यांचेही रुततात काच.
जाणिवेची कड बदलता बदलता उशीवारचे डोके खाली सरकते. 
"झोप नुसताच झोप" हे रात्रींचे ब्रीदवाक्य का रे ?

कन्ह्ण्याच्या प्रकारांची अनुक्रमणिका एक पानभर
आणि गुंफण्याच्या अनुक्रमणिकेत गुंत्याचे प्राणपण

हरलेल्या रात्री, छळलेल्या रात्री
कळलेल्या रात्री, मळलेल्या रात्री
घुबडाचे घुम्घुमने घुमन्याच्या रात्री
मांजरांचे आक्रांत ऐकण्याच्या रात्री
लांडग्यांच्या कळपांच्या लढण्याच्या रात्री
रातकिड्याच्या कर्कश्यश्यात कानथीजन्या रात्री
नकार असून होकाराच्या, होकार असून नकाराच्या
कंसा आतल्या कंसाच्या अटी तटी च्या रात्री.

मध्येच आठवतो
इंद्रायणीचा काठ कसा हागून भरवलाय लोकांनी
प्रसादही उष्टा केला शिवलिंगाच्या उंदरांनी.
अत्तराच्या दरवळलेल्या आसमंतात दुर्गान्धाचा काटा उगवतो,
मेंदूच्या गुलाबी पाकळीत घट्ट रुततो
मध्येच विचारतो
श्रापिता मृत्युलोकाच्या उपभोगात ऋणी आहेत काकुळतीच्या रात्री
विटेवर उभा राहून कोण रे बघतो माझ्याकडे ओशाळ घुम्या रात्री.


Comments

Popular posts from this blog

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

बदल

हे सारं दोघांचं आहे हे आपण दोघेही म्हणतो. तरीही मी म्हणतो बघ तुला काय आवडतंय तस ! पण पडद्यानं पासून उशीच्या अभ्रात्यांपर्यंत मी माझ्या आवडीचं घ्यायला लावलं हे तुझं म्हणणं. कॉमर्स वाल्यांना सौन्दर्यशास्त्र हि शिकवा असा पत्र शिक्षण मंत्र्यांना पाठवावं असं सारखं वाटतं. असो! मी म्हणतो काहीही असो मला एक फील वेगळा लागतो. हो !म्हणजे अगदी टूथब्रशही तुझ्याच आवडीचे? माझी माघार. मग गिरणीत काम करून पीठाशिवाय रहाणं जमलं नाही म्हणू की वखारीत कोळश्या शिवाय म्हणू . माझे तुझे रंग एकसारखे व्हयला लागले इतका माझा इगो तू पाळला मांजरासारखा आता मला आवडलेल तुला आवडायला लागल हे सगळ्यात वाईट झाल. तू कधी कधी इतरांना सागते इम्प्रोव यौर टेस्ट ! माझ्या खांद्यावर एक पक्षी बसतो , मला तो कावळाच वाटतो. तुला तो बगळा, इतक माझ्या मुळे तू बदलव इतका मीही आजून बदललो नाही ग! 

उब

शहरावरचे काळे आकाश कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने . लोक विचारतात ऋतू बदलणार का? कुतूहलाने नव्हे कुत्सितपने. रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे. जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे. अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात, खोकल्यावर जोराने स्वास घेतात, अकारण खांद्यांतून वाकून चालतात, अकारण इतरांच्या चुका काढतात, अकारण दारू पितात माणसे, अकारण सहवासही करतात माणसे. अकारण जगतोय का आपण? इतकं ठामपणे विचारतात की समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा! चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची. वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची. टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे . उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे इ...