हिरमुसलेल, गळून पडलेलं गुलमोहोराच
लाल तांबड अंगण उन्हाळ्याच्या संध्याकाळी
लांब सावल्यांनी बडबडतय.
तहानलेला उशिराने परत येतो
मडक्यातले गार पाणी पितो
तेव्हा हे सगळं ऐकून घेतो.
दुखणाऱ्या उजव्या खांद्यावर पाखरू बसु पाहत
वेदनेच्या वाफेवर तुटलेलं इंजिन धाऊ पाहत.
चाबी देऊन सुध्धा हे चालत नाही
हाताने ढकलले तरी पुढे जात नाही.
ह्या किवा त्या कारणाने चंद्राला उगवावच लागत
तेव्हा तलम मऊ चादरीला नेमके दोन गंध येतात
अवास्तव दुनियेत भान हरवलेल्या सु सु चा
आणि पाच रुपये एव्हड्या महाग वेणीच्या मोगऱ्याचा.
पाठीवरच्या वळांना आणि खांद्याच्या दुखऱ्या बाजुंनाही
तेव्हा नेमक्या दोन आठवणी येतात
एक आई जवळ असण्याच्या,
दुसर मोरपिसाच्या फिरण्याच्या.
स्वार्थ पांघरून तिच्या पाठीच्या कण्यावर
क्याकट्स रुपेरी फुलच उमलते म्हणा ना !
माझ्या पाठीवर बळजबरीचे कुबड,
कानांमध्ये यंत्रासारखा घनांना.
उन्हाळ्यात एसीची कृत्रिम थंडी
मग पुन्हा दुलईची उर्मी गर्मी
पांघरुणा बाहेरच चांदण सोसता येत नाही
पांघरुणाच्या आतुन काळोख पीत येत नाही
बिच्चारा मी, सरलेल्या अंगाई नंतरही
झोप का ग येत नाही?
अनावधानाने रात्र संपते,
स्वतःला बिच्चारा म्हणाल्याची चीड येते,
बहुतेक ह्याच सगळ्या धीम्या हालचालीने
६:४० ची लोकल आजकाल रोज सुटते.
दिवसभर अंगण पडदे सरकण्याची वाट बघत बसलेले,
संध्याकाळी साडे सहाला काऊ चिउशी गप्पा होतात एव्हडच.
क्याकट्स गुलमोहराकडे रागाने बघत असतो
विनाकारण हासण्याच कारण विचारात असतो.
पुन्हा तशीच संध्याकाळ
पुन्हा तोच गुलमोहर
पुन्हा तेच क्याकट्स
कुणाकडे बघू ?
फुललेल्या गुलमोहराकडे,
रुसलेल्या क्याकट्स कडे,
लाल तांबड्या अंगणाकडे,
कि असून नसलेल्या, नसून असलेल्या
नाईलाजाच्या चंद्राकडे.
Comments
Post a Comment