शहरावरचे काळे आकाश
कोसळत आहे घरांवर, थेंबांनी नव्हे राखेने .
लोक विचारतात ऋतू बदलणार का?
कुतूहलाने नव्हे कुत्सितपने.
रोज त्याचवेळी त्याच प्लॅटफॉर्मवर पकडतात
तीच लोकल, आवडती जागा मिळाली नाही
ह्याचही दुःख मिरवतात दिवसभर माणसे.
जांघेमधल्या खाजेगत अकारण चिडतात माणसे.
अकारन नाक मोठ्यानं शिंकरतात,
खोकल्यावर जोराने स्वास घेतात,
अकारण खांद्यांतून वाकून चालतात,
अकारण इतरांच्या चुका काढतात,
अकारण दारू पितात माणसे,
अकारण सहवासही करतात माणसे.
अकारण जगतोय का आपण?
इतकं ठामपणे विचारतात की
समोरच्याला लाज वाटावी स्वतःच्या जगण्याची
आणि ऋषींसारखी ह्याच्या चेहऱ्यावर दाढी सत्वाची
लिफ्ट बंद असली कि जिने चढतांना उतरतांना
नाकात शिरतो दुर्गंध, ढेकणा सारखा!
चिडक्या माणसांच्या घरांना लटकलीय
वटवाघुळे त्यांच्याच चेहऱ्यांची
सवयच असते ह्यांना विष्टा साचवण्याची.
वारंवार सांगतात मला गरज नाही कुणाची.
टोळी जवळ येणाऱ्या नर माकडांना
आधी टोळीतल्या नराला पराभूत करावं लागत
तेव्हाच मिळतात मादा, खायला ओली कणसे
प्रेमाशिवाय संभोगाला तयार होतात ती माणसे .
उबेसाठी जिथे तिथे स्पर्श शोधतात माणसे
इतरांचे संभोगही मनोरंजना सारखी बघतात माणसे
गर्दीत, ट्रॅफिकमध्ये, पावसात अडकली की कुजबुजतात माणसे,
फुगा फुटला तरी शहर उध्वस्त होईल इतकी घाबरतात माणसे.
Comments
Post a Comment