ते बघा खांद्यावर ओझे घेतलेले
आणि ओझे घेऊन वाकून गेलेले
वाकून वाकून चालता चालता
लवचिक हाडांतून पोकळ झालेले.
पोकळ हाडांनी विवशतेचे स्वास घेणारे
शास्वत विवशतेचे उश्वास सोडणारे
स्वास घेता घेता अगतिकतेनं हलणारे
हलता हलता अगतिकतेचा सहारा घेणारे
दिवसाची झंझट रात्रीवर चढवतांना
रात्रीची नपुंसकता दिवसावर लावतांना
बेरीज हिशोब, जुगार- जिंदगी
वजा -शून्य लगाम सुटलेली
मुतारीच्या भिंतीवर मुळव्याधीच्या जाहिराती
किंवा भडव्यांची सुभाषिते नंबरी
युद्धाच्या गप्पा किंवा गल्लीतली लफडी
उघड्यावर न्हाणी म्हणजे फुकट करमणूकी
घरी लपवलीय व्हिस्की लेमनच्या बाटलीत
दूध म्हणून प्यायला फक्त पांढरे पाणी.
चामडीवर गोंदवलेलं तीच नाव लाल शार
त्यात सुबक हार्ट, सापडतंय का शरीरात ?
उधळी लागलेलं तेच घड्याळ
पोखरलेल्या गेलेलं आठवणींचं कपाट
सुर्व्यांची कविता, भटांची गझल
उषकाल? म्हणे अमर रहे अफझल
जोरदार निषेध सोशल नेटवर्कवर
किंवा भर सभेत चहाच्या अड्ड्यावर
सुखावलेलं देशप्रेम, नागरिक कर्तव्य
पालकाच्या महागड्या जुडीसह तेही कोंबलेलं
तोल गेला म्हणजे कोसळणंच कोसळणं
दरीतून घश्यातुन श्वासांतून कोसळणं
श्वासांतून कोसळणं, तोंडघाशी पडणं
निर्लज्ज पणे चिखलाचे आभार मागणं
काय केलं होत अनिवार्य?
नेहमी लागतात मेंढरांना नेते
अडगळी दुकानांचे कापा फिते
छंद म्हणून स्वतःच्याच विष्टेचे विश्लेषण
कुतूहल म्हणून स्वतःच्याच विष्टेचे आकर्षण.
अश्या गर्दीत चुकून उगवलाच सूर्य
पाठीवर विषारी कुणाचे ते डंख
तुम्ही रुतवले तुमचे दळभद्री अंक
ग्रहण नव्हे त्याच्या मस्तकावर कलंक.
Comments
Post a Comment