Skip to main content

Posts

प्रश्न

।। प्रश्न ।। तू जरा  नाक फुगवून रुसून बसते,  उगाच, अकारण  लपवून काही पुटपुटते.   पौंगंडाचे लाडीक वेडे  वय तुझे खरपूससे.  मला वाटले  गालावरच्या पुरळाचे  किंवा काजळ पसरल्याचे  असेल नीताचे गाऱ्हाणे.  ती पुसते रागाने पण निरागस लाजेने  का दिले दैवाने स्त्रीस हे स्तनाचे ओझे ?  समानतेच्या शतका नंतर  अजुन उरले हे कोडे ?  मी पुरुषासम सक्षम  मी नजरेने नभ मोजीते.  मी म्हणालो -  पुरुष तसा कोमलमन स्त्री शक्ती त्याची,   तो बुरुज उभारी परी  तू  माती त्याची.  ती म्हणाली  समज नको उथळशी  हे उत्तर नाही प्रश्नाचे  गूढ कोणते छातीचे ?  मी बावरलो क्षणिक,  उत्तर कसे ते दयावे  हे वय असे, ना दिलासा निर्रुतराने  मी म्हणालो  आईने व आजीने मला न कोणी सांगितले  पण ऐक सांगतो  ताऱ्यांच्या पलीकडचे  कालाच्या उदयानंतरचे  सृष्टीच्या सुरवातीचे  सहस्त्र शिरीश्यांनच्या पुरुषाने  यज्ञाच्या योजनेने ब्रम्हांड बनविलें  हे तू ऐकिले असावे, तेव्ह...

सार -आसार 4

 मिठाच्या नागर्नीला मी हात कुणाचे मागु  आणिली कौतुके तुमची विषाच्या पेरणीला.  आत्म्याचे आस्तित्व हलले , ते सोडू लागले माती  सहानभूती ही तुमची जीव फुटला केरसुणीला.

सार -आसार ३

सार -आसार  ३ मी मीठ कणांनी रडलो तेव्हा समुद्र हसला होता, दुःखाला कुरवाळीत बसलो,हा आशय त्याने केला.  आरसे तोडुनी सारे, डबक्यात विसर्जित केले   क्षितिजावर नागडे होऊन, चंद्र नाचला होता.  श्रीकांत नरेंद्र पुराणिक 

अजून तू अशी

काही पांढऱ्या छटा तुझ्या कपाळावर दिसु लागल्या  आणि नजरेत ओढून घेणारे संमोहन उतरू आले.  थोडी विचलित, थोडी विलगता, थोडे गांभार्य, थोडे प्रेम,   छटा होत्या शिशिराच्या, सारेच डोळ्यांत घडू लागले .  चाळीशीच्या धीराने, केवड्याचे अत्तर दरवळू लागले  तुझे रूप दाट गुलकंदाचे, मन प्रसादाचे तांबूल झाले. कुंड्यांमधले, वृन्दावनचे देठन देठ हिरवे झाले,  पाटीवर नाव माझे सुचक, घर तुझे कृतार्थ झाले. चंदनाचे होते कि होते खैराचे वा बाभळीचे  करपलेले तुझे हात घट्ट मळलेले पीठ होते.  मी दुःख रेखाटून कागदाचे फुल झालो  जे भोगले तु, ते वाळवणाचे गीत झाले.  तुझ्या त्वचे खाली इंद्रायणी गुप्त झाली,  मी उकरून काढतो रक्तबीजाच्या ओळी  मनधरीनी करिता ही, उजळतो तुझा रुसवा  ते रुसणेही असते उबदार गुळाची पोळी  मी परिघावर बिंबित अर्थ शोधतो जगण्याचा                         फिरतो बाजार शब्दांचा, पटके बांधून डोक्याशी  तू नसतेस नेटकी साडी, खोचते पदर पोटाशी  हा सुगंध दरवळणारा, असतोच तुझ्...

सार -आसार 2

 जाणिवांचा प्रवास मनाकडून जखमेकडे होतो,  की जखमेकडून मनाकडे आधी जी दिसते आणि मग ऐकू येते,  त्या विजेला हे ठाऊक असेल का ?

सार -आसार 1

सूर्याची किरणे येतात अगदी सरळ रेषेत  अंगणात, गर्भगृहात, आणि डोहात  मृत्यू कसा येतो हे त्यांना विचारावे का ?  कुंठित प्रश्न अडकलेला दर्भात. 

आलिंगन

 आलिंगन  तुझे ओठ पलाशच्या टंच पाकळ्या होतात, तेव्हा मी पारंब्यांच्या जाळीतून धनेश उडतांना बघतो.  ध्यान एकाग्र करतो भुवयांमध्ये, चंदनाचा गंध दरवळतो, तुझे केस जाळं पसरल्यागत विखरू लागतात, मी गार भस्म होतो.  तुझ्या काजळाच्या रेषा अजूनच तीक्ष्ण होतात, मला तिमिराच्या कोसेतून मुक्त होणारा नाग दिसतो.  स्वप्नांत कळतं का कधी स्वप्नाचं वेळभान? केवडा विषावर घेरतो, तुझी बोटे छातीवर फिरतात, शिवारावर शिंगरू थबकतो, मी गप्प होतो.  तुझ्या गोऱ्या वक्षाशेजारी निळी हिरवी वेल तप्त होते, उंच फांदीवर बसलेलं जनावरं ढिबक्यांचं टापदिशी खाली येतं.  मी ओंजळ रिकामी करतो, एकटं रेषांचं  झाड बगळ्यांनी भरू लागतं  उबदार तुझ्या श्वासांनी माझे कान हलके होतात, हवेत मारवा स्तिर होतो . 

तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी

 तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  जागा होतो तेंव्हाही तुझ्याच गंधाने दरवळतो मी. कधी वाटते तुझी कुंडले  सापडतील मज अभऱ्याखाली. कधी वाटते खांद्यावरती  केस तुझे निखळले राहतील. तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  माझेच मला मिठीत घ्यावे इतका हर्षून जातो मी. कधी वाटते खरो खरीच  तुझ्यासवे जगतो मी  तेव्हा तेव्हां अलगद कळते  गोकुळातच असतो मी. तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  अंतरंग अंतरिक्षाचे व्हावे असा स्वप्नमय होतो मी. कधी वाटते प्राणांतिक गात्रे  तुझ्या स्पर्शाने पवित्र होतील  कधी वाटते चंदन सारे  अंगावरती बहरून येईल. कधी वाटते कळेल  सारे  राना मधल्या मोरांनाही  कधी वाटते प्रभाकरही  रश्मीला  धाडेल दुपारी तुझी शंभर स्वप्ने एका रात्री बघतो मी  रज्जुमधल्या कणाकणाला वाहवलेला कळतो मी. इतक्या इतक्या लांब रात्रींना  रात्र तरी म्हणू कसा मी  उजळतात चक्षुतून सूर्ये  जेव्हा तुझी स्वप्ने बघतो मी. 

दगड

  एकन एक दिवस असा जातो  काही काही मनाला खेळवुन ठेवत नाही. मग वीज कडाडली काय किंवा गार झाली काय, मोर सुरांवर थकला काय आणि नाचून मेला काय, ओझ्या खालचं डोकं झिजण्यासाठी  मानेवर चेहेऱ्यासकट लावावं लागलं तरी काय? ओल्या सुक्या फुलांच्या स्पर्शानेच काय, पण चिकण्या जाघेंवरून मध जरी वितळले  तरी आत काही पाझरत नाही. कोरडा दगड कोरडा रहातो,  पाऊस पाण्यान भिझला  म्हणून  मऊ होत नाही. विटेवर चैतन्याचे अंतरिक्ष,  गाभार्याला प्रतिध्वनीचे स्वर, आपले आपण ऐकतो किंवा तुळशीदळाच्या  तिखट स्वादाने जिभेचे सुटतात जाळे,  रामदासांच्या करुणाष्टकांतून  काचेवर खिळलेल्या किंचाळी पलीकडेही  डोळ्याच्या खाचांना आंधारचे प्रेम जडले तरीही  काही काही होत नाही.  स्वतःची पिल्लं खाणाऱ्या  मांजराला पळतोय, तुला माणूस म्हणायचं?  कुणाच्या प्रेताला कुणाच्याही नावे जाळा त्याच पैश्याने दारू पिऊन  स्वतःच्या प्रेताला घरी नेतांना  तो तुला वाटेत भेटतो  तु त्याच्या गाडीला आणि गांडीला सलाम करतो,  आदरभाव दाखवतो, तुला माणूस म्हणायचं?  अरे मध...

कसेही आणि काहीही च्या संदर्भात

नकोशी झालेली माणसे जवळच बाळगून  तो  घर सजविण्याच्या कल्पनेत रमतो,  कुणासाठीतरी महागडा बुके विकत घेतो  गाडीच्या मागच्या सीटवर मुद्दाम विसरतो.  चादरीला चारही कोपऱ्यात घट्ट बसवतो  वळ्या दुर करतो, स्वतः सोफ्यावर आडवा होतो.  पहिल्या प्रियेसीच वाढलेल्या पोटावर केलेलं कमेंट  वाचतो आणि डोळे मुद्दाम मिटतो.  शेव्हिग क्रीमच्या जाहिरातीत काय भारी ट्यून आहे  ती गुणगुणत आरश्यासमोर उभा राहतो, एक्सेल शीटच्या रिकाम्या रखान्यात  कानावरचे केस अलगद कात्रीने कापतो.   हरवलेल्या पावसाळी दिवसांची आठवण   मोरपिसांसारखी हळुवारच असावी अशी सक्ती नाहीना?  बंद पडलेलं घड्याळ दिवसातून दोनदा वेळ बरोबर दाखवते  एव्हडे तरी नीट आज आपण वागतोय ना?   बरेचदा प्रश्नही तेच ते पडतात   इतका रटाळवाणा दिवस जातो, ती वारंवार पदर नीट करते आणि  तो    फक्त चष्म्याच्या काचा स्वच्छ करतो.   आजकाल कुणाच्याही भेटीला जातो   काय बोलावे आधी विचार करतो   मरीन ड्राईव्ह पेक्षा कुर्ला स्टेशन वर ...

बायको

कोणीतरी कोणावर आभाळाएव्हड प्रेम करतो पण आभाळाच्या कुशीत शिरता येत नाही तीस वर्ष्याच्या घोड्म्याला आईही मांडीवर बसवत नाही. मग क्षणाची पत्नी आनंतकाळाची माया देणारी होते. वात्स्यल्याला नसतो दुसरा पर्याय ती आत्म्याची छाया होते. स्तनां बदलची जिज्ञासा, माया, कौतुक, आश्चर्य,प्रेम, भावविश्वाची सहनशील पोलादी ढाल कमाल होते "तिथेच पुरुषांचे भावते " अस ती म्हणते. भिजू घातलेली कडधान्ये रात्रभर भिजतात भांड्य बाहेर येतील इतकी ती फुगतात अंकुर फुटलं तरी स्वतःला दुभागून उगवायच तिसरच काही हाड नसलेल्या जिभेचे दोष एका शब्दाचे होते काही वाही अबोल्याच्याच सकाळी नेमकी उसवते बाही किंवा महत्वाच्या  कागदावर हवी असते सही. पहाटे अलगद येतो एक हात छातीवर अबोल्याच्या पाच रात्रींनंतर केव्हडे वजन हा… . .! श्वास अड्तोही, भराभर घेतोही रेटीना च्या पापुद्र्यावर घडी वर घडी साखळी टाक्याला चुकलेली तू उसवते एक एक कडी. मग तुझा हात घसरत जातो छातीवरून ढगांच्या मऊ कासव पावलांचा, चढलेला आसतो मोराच्या धुंद कंठा मध्ये ब्रम्ह लहरी नाद. पुढे घड्याळीचे कुटील कारस्थान किंवा दुधवाल्या माकडाचे भूभ...

ओशाळ घुम्या रात्री.

एक लाडिक गुलाबी चम्बु शब्दांना आलेले आकार आवाजांचे पुंजके, चिऊ काऊ ते हाऊ वर  कधी कौसल्येचा राम कधी नाणी तेरी मोरणीको हे सगळ पांघरूनाच्या तंबूतून घडतंय. एका महाकाव्याच्या तिसऱ्या पर्वात पाठीवर दणका आणि "झोप ग आता" चंद्र पर्येंत पोचतंय. तो तरी काय करणार बिच्चारा? दिवसाच्या चाळणीतून, बोललेलं, घडलेलं, धावलेल, पाडलेल सगळच्या सगळं ओवल जातंय पटकथेच्या अभ्रकी तुकड्यातून अतिभयानक स्वप्नाच्या गळ्यात. सगळी रात्र लाथा लाथ झोपेत खुदकन हसली मग थोड्यावेळाने पुटपुटली एव्हडं काय ग ओरडण्यासारख त्यात? रात्र जेव्हा अधिकच काळी होते गडद कावळ्याच्या पंखासारखी जळलेल्या भाकरीची किंवा राखेची चव आठवते ओठांना पावसाळी बुटात दडलेल्या बेडकाचा स्पर्श आठवतो बोटांना. ओठांवर असत ते मृत्यूच गीत की दीर्घ चुंबनाचा तुरटपणा शिशिर झोप कि अवास्तव पाण्यात त्वचेवरचा गुळगुळीतपणा.  कबंधापुरते बरे असते झोपेत आलिंगन.  कबंधापुरता बारा असतो श्वासांचा वेग.  कबंधापुरता बारा असतो झिरपणारा घाम.  कबंधापुरता बारा असतो  पेललेला भार. त्यापलीकडे मुठी एव्हड्या उंदराला सापांच्या जात...

नाईलाजेचा चंद्र

हिरमुसलेल, गळून पडलेलं गुलमोहोराच लाल तांबड अंगण उन्हाळ्याच्या संध्याकाळी लांब सावल्यांनी बडबडतय. तहानलेला उशिराने परत येतो मडक्यातले गार पाणी पितो तेव्हा हे सगळं ऐकून घेतो. दुखणाऱ्या उजव्या खांद्यावर पाखरू बसु पाहत वेदनेच्या वाफेवर तुटलेलं इंजिन धाऊ पाहत. चाबी देऊन सुध्धा हे चालत नाही हाताने ढकलले तरी पुढे जात नाही.  ह्या किवा त्या कारणाने चंद्राला उगवावच लागत तेव्हा तलम मऊ चादरीला नेमके दोन गंध येतात अवास्तव दुनियेत  भान हरवलेल्या सु सु चा आणि पाच रुपये एव्हड्या महाग वेणीच्या मोगऱ्याचा. पाठीवरच्या  वळांना आणि खांद्याच्या दुखऱ्या बाजुंनाही तेव्हा नेमक्या दोन आठवणी येतात एक आई  जवळ असण्याच्या, दुसर मोरपिसाच्या फिरण्याच्या. स्वार्थ पांघरून तिच्या पाठीच्या कण्यावर क्याकट्स रुपेरी फुलच उमलते म्हणा ना ! माझ्या पाठीवर बळजबरीचे कुबड, कानांमध्ये यंत्रासारखा घनांना. उन्हाळ्यात एसीची कृत्रिम थंडी मग पुन्हा दुलईची उर्मी गर्मी पांघरुणा बाहेरच चांदण सोसता येत नाही पांघरुणाच्या आतुन काळोख पीत येत नाही बिच्चारा मी, सरलेल्या अंगाई नंतरही झोप का ग य...

कल्चर शॉप मध्ये कविता वाचन

मी कविता वाचू लागलो की त्यांचं पोट खळबळत संडास लागते इतकी माझ्या शब्दांची प्रतिभा?  मला जाणवते!  विंदा, सुर्वे, ढसाळ, चित्रे ऐकतायना ? एका कविता वाचनाच्या कार्यक्रमात विदेशी लोकांना आम्ही कविता भाषांतरित करूनहि ऐकवल्या पण इंडियन इंग्लिश कवीना त्यांच्या कवितेचा अर्थ हिंदीत सांगता आला नाही कार्यक्रमाचे तिकीट २०० रुपये कवी लोकांना चहाही विचारला नाही. ओपन माईक सुरु होताच कळलं ऐकणारेही कवीच होते कवी प्रेक्षकांच्या रांगेत बसले प्रेक्षक मंचावर गेले . त्यांनी मग जाहिरात केली फेसबुक वर सगळ्यांचे फोटो मी माझा फोटो व दुसरा टाळ्या वाजवणाऱ्यांचा लाईक केला. जे मित्र येऊ शकले नाही त्यांनी कंमेंट केल्या "तुझ्या सारखा दुसरा कवी होणे नाही" विंदा, सुर्वे, ढसाळ, चित्रे ऐकतायना ?

संध्याकाळ

आम्ही थकलो की घरी येतो ते थकले की बार मध्ये बसतात काही थकले तरीही ऊन उतरिणीला मरिनड्राईव्हच्या तापलेल्या कट्ट्यावर बसतात. काही नाटकाच्या तालमी बघायला किंवा रिकाम्या गाडीची वाट बघत बांद्र्याची हिरवळ चष्म्याच्या काचा पुसत लुटतात.  कधी कधी थकलेला असतानांही ते माडीवरही जातात व परत फिरताना मारोतीला. चहा बारा वाटतो दिवस उतरणीला तू मुद्दाम मसाला जरासाच वापरते बशीत एक चमचा साय. हे बघून हायस होतं अजून दुधावर साय येते? गोठ्यात गाय हंबरते. मुले गेली आहेत खेळायला किंवा क्लास ला मुली कराटे ला, मुले डान्सला. दार तिरप बंद आणि ऊन परततय तुझ्या मानेवरचा घामाचा थेंब चमकतोय. पुढच काय बोलु ब्यागेत तिच्या साठी गजरा आहे! डबा काढतांना ती माझ्या कडे डोळ्यांनी हसेल सोफा कम बेड पाय ताणेंल पुढे सरकेल. मग मी एक घोड चूक करतो टीव्हीचा रिमोट हातात घेतो लगेच बातम्या लागतात खोलीत अंधार होतो.

जूनच्या पहिल्या आठवड्यात

प्रजासत्ताक देशात उगवलेल्या जून महिन्यात व्यकुळतेला आलेलं उधाण उन्हाच्या चटक्यात घाम फुटणाऱ्या त्वचेचे शेतजमिनी सारखे नांगरले जाणारे नखांचे व्रण चष्म्याच्या काचेवर येणार चहाचे फुंकर कण एक एक पायरी चढून जाणारी ती गर्भवती आणि शेजारी सार्वजनिक संडासावर वाढलेली गर्दी बोळीच्या भिंत्तीवर "अल्ह्ड जवानी" चे चार पोस्टर वारंवार झळकणारे ते स्तनाळ चित्र, कोळश्यांनी लिहिले भडव्यांनी आपले फोन नंबर, चिंक्की चाहिये या मालियाली मिलेगा सब अंदर पानाच्या पिचकाऱ्या, सिगारेटीचे थूट, वास, दुर्घन्ध सकाळी ७:०२ ची लोकल ची गर्दी येते कधी नाहीशी होते कधी बूटपॉलिश वाल्यांच्या च्या टाप टाप आवाजात किती खेटर्र आली गेली प्रत्येक बुटात होतेच का पाय? चामडीच्या पोकळीला बुटांचे आकार चालवतात कि काय? तो न्यूजपेपर विकत घेतो मी रंगीत पान मागून घेतो हेडलाईन्स वाचून पारा चढतो म्हणून त्यालाही रंगीत पान हवं असतं. एका हाताने वारा घालत तो म्हणतो न्यूजपेपर संडास मध्येच वाचलेला बरा असतो. दुर्गंधात दुर्घन्ध जाणवत नाही. काही गमावलं ह्याच दुःख नाही. राष्ट्रवादी समाजवादी माओवादी मायनॉरिटी बहुजन ब्राह...

रानातल्या वाटेवर

जंगलाच्या वाटेने गोठणाऱ्या ठण्ड रात्री गाडीच्या हेडलाईट समोरून अचानक काहीतरी निघून जातं विजेच्या झटक्यानं, शिंगाना गवसणी घालून पाठीवर आरूढ.  धड धड वाढते. केवढे ते विस्तृत शिंग तीक्ष्ण आणि रात्र चवताळून अंगावर येते धावून. आपण त्याच प्रकाशात बघतो रस्त्याच्या कडेन झुडूप पार करत दिसतात चमचमणारे डोळे मात्र तो विचार तिथेच मरून पडला असतो. काय करावं? हे प्रेत गाडीत न्यावं सोबत ? कि फक्त नख न्यावी गळ्यात घालायला? कि मुंडकं न्यावं कापून भिंत सजवायला? इतके रानटी विचार येतात कुठून ? इथवर तो नाहीसा होतो रस्त्यावर काळा डाग उरतो. असेच कित्तेकदा अचानक एक झुडूप पार करून दुसऱ्या झुडपाआड जातांना आपल्या हिंस्त्र नजरेनं तो माझ्याकडे बघतो दरवेळेस मी हमखास त्याच्यावर गाडी चढवतो आणि दर वेळेस वाटत एखाद्यावेळी गाडी बंद पडली तर ?

तुलना

तुझे सारे पूर्वीच ठरलेले असते तरीही बदल होतोच तो बदलही पूर्वीच ठरलेला असतो त्याला प्लान बी म्हणायचं हे हि पूर्वीच ठरलेलं असतं. मी आपला अनप्ल्यानड असतो मला स्पॉंटिनीअसपणा  आवडतो अस मी म्हणतो. आणि तू मला अनऑर्गनाईस म्हणते मग मी तुला स्टिरिओटाईप  म्हणतो त्यावर तू मला लेझिनेस चा एव्हरेस्ट म्हणते आणि मी त्यावर तुला ऍक्सीडेन्ट प्लॅनर कारण तू ठरवलंस तर अपघात हि प्लॅन करशील. ह्या सगळ्याला आपण शुद्ध मराठीत जेनुइन कूल कन्व्हर्सेशन म्हणतो. आता आवाज वाढणे आणि आदळ आपट होणे हे प्रेमात ग्राह्य आहेच. पण माझं हे मत आहे कि उनाड भटकंती आणि नियोजित यात्रा ह्यातला फरक त्यांनाच कळतो ज्यांना अचानक ऑफिस सोडून हाय टाइड बघायला मारिन ड्राइव्ह वर जाता येतं. तुम्ही तुमचं आस्तित्व शोधण्यात गुंग असता खरच तुमची महत्वाकांक्षा फार मोठी असते. मी आपला मजा करतो जगतो अस्तिव  माणसांचं आणि अस्तिव खुद्द ह्या तुलनेत वेळ घालवायला नसतो माझ्याकडे .

चाळीशीत

डिजिटल झाला तरी रेडिओ खरखरतो काही गोष्टी स्वभाव बदलू देत नाही. हसण्याचाही प्रयत्न करावा लागतो खोटे दात खरे वाटावे इतका मी हसतो. अवघड होते कधी कधी चांगल्या शिव्या आठवत नाही असभ्य वागावे कधीतरी तर चेहर्या वरून जाणवत नाही काढा किंवा निकाढा, कडूपणा किती चांगला हे पटवून देण्याचा हुरूप आला की साखर वाढते. चाळीशीत बाप होतांना, नेमकं कुठल्या क्षमतांवर हायस वाटावं कुठल्या क्षमतांवर चिंता करावी. चष्मा आणि पांढरे केस, कशाला चढाओढ करावी. कर्तव्य असो किंवा हक्क कलम करून नमूद करत येतं नियम बाह्य ते प्रेमच पुन्हा सर्वत्र स्वीकार्य असतं. साधी संध्याकाळ पण कातरवेळ म्हणावी ही कवींची शब्द निवड, आपल्या म्हाताऱ्या बापासोबत सिनेमाला जावं ही आपली आवड. 

फांदीवर

पूर्वी शेजारी असायचे  बडबड, गप्पा मारायला  सगळ्यांनाच आवडायचं  गाह्रानी गायला.  आता उरलेत कावळे  तेही आज उडाले  कोण छतावर  काय वाळवण घातले  समोरच झाड शोभेसाठी जपून ठेवलय सोसायटीने   एक घरटं आहे  मादा कोण आणि नर कोण  मन कावळ्यातही वर्चस्व आणि दडपण शोधात आहे.   माझी घालमेल झाली कि  मला सारखं आठवतं  कावळा कुरडतडतो जिवंत सरड्याला  का वळला असेल तो  माझ्याच काचे कडेला ? आपण मुद्दाम दुपारचं  ऐकावं राजन साजन मिश्र  आणि हा एकाच  कवकवकण्याचे  सूर बदलतो आहे.  सूचना आणि तेच ते  घरातही हे न ते  सारखं मला  आठवून देत आहे.  किचनच्या खिडकीत आल्यावर   पोळ्याचें तुकडे पळवायचे  पण बंद काचेला चोची मारून  तू काय मिळविले आहे.  सवयीचा भाग आहे असं म्हणायला आयुष्य  फार काही प्रॅक्टिकल झालं नाही  पण तुझ्या शिवाय करमत नाही  हे माझं म्हणणं मुळीच नाही.  ...